शिक्रापुरात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा; बैलांच्या मिरवणुकीत ढोल पथक, जेसीबीतून फुलांची उधळण
बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि शेतकऱ्यांच्या आवडीचा सण या दिवशी शेतकरी आपल्या बैलाचा उपवास करुन बैलांना आंघोळ घालून बैलांना रंगवून त्यांची मिरवणूक काढून पूजा करत असताना शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला आहे.शिक्रापूर ता. शिरुर सह परिसरातील अनेक ठिकाणी बैलपोळा साजरा होत असताना शिक्रापूर येथील उद्योजक ओंकार कर्डिले, आमीर शेख यांनी ढोल पथकाच्या ताफ्याच्या नृत्याने तर माजी चेअरमन निलेश थोरात यांनी चक्क जेसीबीने फुलांची उधळण करत बैलांच्या पुढे ऑर्केष्ट्रा ठेवत बैलांच्या विशेष मिरवणुकीचे आयोजन केले होते.
दरम्यान बैलांची मिरवणूक निघालेली असताना पन्नास युवक युवतींच्या ढोल ताशांच्या ताफ्यात बैलांची गावातून मिरवणूक निघताच नागरिक जल्लोष करु लागले, शिक्रापूर येथे ओंकार कर्डिले, माजी चेअरमन निलेश थोरात, प्रगतशील शेतकरी स्वप्नील करंजे, सिकंदर शेख, बैलगाडा शौकीन आमीर शेख, भूषण आळंदीकर, सोहम गायकवाड यांसह आदींनी बैलांच्या मिरवणुका काढल्या असताना गावातील राऊतवाडी, वाबळेवाडी, चाकण रोड परिसरात शेतकऱ्यांनी त्यांच्या बैलांची प्रत्येक भागात स्वतंत्र मिरवणूक काढली असल्याने शेतकऱ्यांचे बैलांवरील प्रेम दिसून आले. तसेच यांत्रिकीकरणाच्या काळात देखील शेतकऱ्यांनी बैलांचा सांभाळ केल्याने तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष उत्तम गायकवाड यांच्या वतीने चेअरमन निलेश थोरात व प्रगतशील शेतकरी सिकंदर शेख यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना यापुढे बैलपोळा मिरवणूक मध्ये जास्तीत जास्त बैलजोड्या सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मिरवणूकचे आयोजक ओंकार कर्डिले, निलेश थोरात, अमीर शेख यांनी सांगितले. शिक्रापूर येथे बैलपोळा निमित्ताने निघालेल्या बैलांच्या मिरवणूकमध्ये बैलगाडा मालक अमीर शेख यांचा शंभू व निलेश थोरात यांचा शिवा हि बैले बैलगाड्याची असल्याने बैले एका जागेवर शांत उभा न राहता नुसते बेफान होत असल्याने शंभू व शिवा हि बैले लक्षवेधी ठरली आहे.