कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर,चार दिवसांनी मृत्यू, पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू

कोपरखैरणे सेक्टर ३ मधील चिकणेश्वर गार्डन परिसरात ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या किरकोळ वादातून गंभीर मारहाण झालेल्या गणेश पांडुरंग पारकर (वय ५०) यांचा बुधवारी उपचारादरम्यान वाशी येथील ‘न्यू एरा’ रुग्णालयात मृत्यू झाला.या घटनेमुळे कोपरखैरणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालयाने दिलेल्या मृत्यूनंतर कोपरखैरणे पोलिसांनीया प्रकरणात हत्येचे कलम वाढवले असून उर्वरित पसार आरोपींचा कसून शोध सुरू केला आहे. (Navi Mumbai Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४:१५ च्या सुमारास गणेश पारकर हे कोपरखैरणे सेक्टर ३ मधील चिकणेश्वर गार्डन जवळ असताना संशयित आरोपी सावकार सावळे (वय ५०), बाळू सावळे (वय ४५), सूरज गोडसे (वय २८) आणि विनय मालवणकर (वय २५) यांनी किरकोळ वादातून त्यांच्याशी हुज्जत घातली. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि सावकार सावळे याने गणेश पारकर यांच्या डोक्यात बॅटने जोरदार प्रहार केला. यामध्ये पारकर यांच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर झाली, तर इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *