आंदोलनावरून पडळकर भडकले ! ‘रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागणीने डागलं पाहिजे,’ भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( MPSC) परीक्षांमधील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. या मागणीसाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारयांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. आता या आंदोलनावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे. सांगलीमध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं. “रोहित पवार यांचे डोके मेंढराच्या डागणीने डागलं पाहिजे,” असं ते म्हणाले. एमपीएससीच्या अध्यक्षांसोबत झालेल्या बैठकीत रोहित पवार यांनी अध्यक्षांच्या राजीनाम्याची आवश्यकता नसल्याचं म्हटलं होतं, असा दावा पडळकर यांनी केला. त्यानंतर पुन्हा राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित करण्यावरून त्यांनी रोहित पवारांना लक्ष्य केलं.
आम्हीही आंदोलनं केली आहेत; मात्र रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा तमाशा केल्याचा आरोप पडळकर यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे एमपीएससी आंदोलनावरून सुरू असलेल्या राजकीय वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून, सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं पडळकर यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यावर आंदोलन राजकारणविरहित राहायला हवं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. आंदोलनादरम्यान नेमकी काय घटना घडली, याची माहिती नसल्याचं सांगत विद्यार्थ्यांची माथी भडकवणं रोहित पवार यांनी थांबवावं, असंही पडळकर म्हणाले.
यावेळी पडळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राज्यसभेवर पुन्हा निवडून येण्याची चिंता राऊत यांनी करावी, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला त्यांच्या सल्ल्याची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं. केंद्रातील सरकार कोसळणार असल्याच्या राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, गेल्या सहा वर्षांपासून ते सरकार पडणार असल्याचं सांगत असल्याचा टोला पडळकर यांनी लगावला. दरम्यान, एमपीएससी परीक्षांबाबत विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याचा मुद्दा यावर पुढे काय निर्णय होतो, याकडे विद्यार्थ्यांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.