‘पराकोटीची हुकूमशाही!’ अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी – शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत
राजधानी दिल्लीत आधी AISF कडून आणि त्यानंतर INDIA आघाडीकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. आज (शनिवार, 10 ऑकटोबर) कॉकरोच जनता पार्टीकडून जंतर मंतर येथे आंदोलन पार पडणार होते. पण त्यापूर्वीच, दिल्ली पोलिसांनी CJP च्या अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्यासह इतर CJP पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यावरून आता देशभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अश्यातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यावर मोठी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीकास्त्र सोडत “मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे,” असे विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून सद्यस्थितीवर भाष्य केले. ते यावेळी म्हणाले, “No nation can be grateful at the cost of its liberty” हे उद्गार आहेत, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. नोव्हेंबर १९४९ ला भारतीय राज्यघटनेचा मसुदा सादर करताना त्यांनी हे अतिशय महत्वाचे उद्गार काढले होते. एखाद्या नेत्याच्या आंधळ्या भक्तीसाठी किंवा त्याच्या तऱ्हेवाईक वागण्याला खतपाणी घालण्यासाठी या देशाची स्वातंत्र्य, अभिव्यक्ती ही मूल्य अजिबात पणाला लागता कामा नयेत.”“हे वाक्य आज पुन्हा म्हणावं लागतंय. कारण मोदी आणि शाह या जोडीच्या मनात आणि डोक्यात अत्यंत पराकोटीची हुकूमशाही बसली आहे . या हुकूमशाहीच्या जोरावर या जोडीने देशातील सगळ्या यंत्रणांना काबीज करून जी सत्ता मिळवली. आणि जी सत्ता फक्त मूठभर उद्योगपतींच्या हितासाठी राबवली जात आहे. सत्तेच्या या मस्तीला विरोध केला, त्याच्या विरोधात निदर्शनं केली म्हणून, जर आंदोलकांना चिरडलं जाणार असेल आणि त्यांना अटक केली जाणार असेल तर, त्यांच्या या बेबंदशाहीला या देशातून खालपासून वरपर्यंत उखडूनच काढलं पाहिजे !”