वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष
पोलीस दलात काम करत असताना अनेकदा अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आवडीनुसार किंवा कौशल्यानुसार पदस्थापना मिळत नाही. वाहतूक विभागात असे अनेक पोलीसअधिकारी व अंमलदार आहेत, ज्यांना फील्ड वर्क किंवा ट्रॅफिक नियंत्रणात रुची नसतानाही तेथे काम करावे लागते.
याउलट, गुन्हे उघडकीस आणण्याचे विशेष कौशल्य असणाऱ्या अनेक तल्लख अधिकाऱ्यांना ट्रॅफिक शाखेत कर्तव्य बजावावे लागत आहे. अशा अधिकाऱ्यांना ‘गुन्हे शाखा’, ‘डिटेक्शन शाखा’ किंवा ‘पोलीस ठाण्यांमधील तपासी पथकांमध्ये’ काम करण्याची योग्य संधी मिळाली, तर गुन्हेगारीवर मोठा वचक बसू शकतो. याचे ताजे आणि बोलके उदाहरण नुकतेच पनवेल वाहतूक शाखेच्या कामगिरीवरून समोर आले आहे.
१० ऑक्टोबर २०२६ रोजी नवरात्रीनिमित्त विशेष मोहिमेदरम्यान, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, सह आयुक्त दीपक साकोरे, उपायुक्त डॉ. राहुल खाडे व सह आयुक्त योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी आणि त्यांचे पथक आंबेडकर पुतळा परिसरात नाकाबंदी करत होते.नाकाबंदीदरम्यान एक संशयित इसम तेथे घुटमळताना आढळला. पोनि सुभाष पुजारी यांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या हातावर जखम दिसल्याने संशय बळावला. विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव दीपक फतेहसिंग सुराडकर (वय ४४, रा. बुलढाणा) असे सांगितले. त्याने कौटुंबिक व जमिनीच्या वादातून स्वतःची आई सरस्वती (७५), भाऊ संजय (४८) आणि पुतण्या रणजित (२१) या तिघांची निर्घृण हत्या करून पळून आल्याची धक्कादायक कबुली दिली.
पोनि पुजारी यांनी तात्काळ चिखली पोलीस ठाणे (बुलढाणा) येथे संपर्क साधून खात्री केली असता, आरोपीविरोधात तिहेरी हत्येचा गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. वाहतूक शाखेच्या या सतर्कतेमुळे एक अत्यंत धोकादायक आणि पसार झालेला आरोपी अवघ्या काही तासांत गजाआड झाला.
या कामगिरीत पोनि सुभाष पुजारी यांच्यासोबत अंमलदार पोना/४४१५ विश्वनाथ पाटील, पोना/३१०१ केशव निकम, पोहवा/२३३५ ढेंबरे, पोशि/१२०६५ संजय घाटगे आणि पोशि/४६९७ महेंद्र गळवे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नवी मुंबई पोलीस दलात पोनि सुभाष पुजारी यांच्यासारखे क्राईम डिटेक्शनची उत्तम आवड आणि कौशल्य असलेले अनेक अधिकारी व कर्मचारी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. अशा निष्णात आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी त्यांना गुन्हे शाखा किंवा पोलीस ठाण्यांच्या डिटेक्शन टीममध्ये संधी देणे गरजेचे आहे, असा सूर आता पोलीस वर्तुळातून व्यक्त होत आहे.